पंतप्रधान मोदी यांनी सुरु केलेल्या आत्मनिर्भर भारत योजनेला साजेसा निर्णय मंत्री मंडळाच्या सुरक्षा समितीने मंजूर केला. या निर्णयानुसार भारताच्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) यांनी बनविलेल्या भारतीय बनावटीच्या तेजस फायटर जेटच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली. लवकरच ८३ तेजस फायटर जेट विमानांचा समावेश भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात होणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या कराराबाबत एक निवेदन दिले आहे. हवाई दलाला बळकट करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तेजस या फायटर जेटच्या ४८ हजार कोटींच्या डीलला मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीने (CSS) मंजूर केला आहे. सीएसएसने पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली या करारास मंजुरी दिली आहे. ही डील संरक्षण क्षेत्रात गेम चेंजर सिद्ध होईल, असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले.
तेजस फायटर जेट विमानाची विशेषता
भारतीय वायूदलामध्ये 42 स्क्वॉड्रनची गरज आहे. मात्र सध्या फक्त 30 स्क्वॉड्रन उपलब्ध आहेत. एका स्क्वॉड्रनमध्ये कमीतकमी 18 लढाऊ विमानं असतात. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीकडून 83 विमानं खरेदी केल्यांनतर वायूदलात आणखी 3 ते 4 स्क्वॉड्रन वाढतील. ज्या तेजस विमानाच्या खरेदीसाठी मंजुरी दिलेली आहे, त्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत. हे विमान तयार करण्यासाटी 60 टक्के भारतीय तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला आहे. तेजसचा वेग प्रतितास 2200 किलोमीटर आहे. म्हणजेच या विमानाचा वेग आवाजाच्या वेगापेत्रक्षा दीड पटीने जास्त आहे. या लढाऊ विमानाची 6560 किलोग्रॅम वजन वाहून नेण्याची क्षमता आहे. तसेच हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करण्याचीसुद्धा या विमानामध्ये क्षमता आहे. तेजसमध्ये लेझर गाईडेड मिसालईल्स असून त्याचा अपयोग शत्रूंचे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी करता येऊ शकतो. शत्रूंच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी इस्त्रायली रडार यंत्रणासुद्धा तेजसमध्ये आहे.
तेजस हवेतून हवेत आणि हेवतून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्रे डागू शकतो. या विमानावर जहाज विरोधी क्षेपणास्त्र, बॉम्ब आणि रॉकेटसुद्धा लावता येऊ शकतात. तेजस ४२ टक्के कार्बन फायबर, ४३ टक्के अल्युमिनियम धातूंचे मिश्रण आणि टायटॅनियमपासून बनवण्यात आले आहे. तेजस स्वदेशी चौथ्या पिढीचे टेललेस कंपाऊंड डेल्टा विंग विमान आहे. हे चौथे पिढीतील सुपरसोनिक लढाऊ विमानांच्या गटामधील सर्वात हलके आणि सर्वात लहान विमान आहे. तेजस लढाऊ विमानांना (LCA) भारतीय हवाई दलाने पश्चिमेला पाकिस्तान सीमेजवळ तैनात केले आहे. या निर्णयाने देशाच्या सुरक्षा दलांची क्षमता कित्येक पटीने वाढणार आहे. तसंच आत्मनिर्भर भारत योजनेला चालनाही मिळणार आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.