मल्याळी चित्रपट सृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक ‘प्रीतम’ या चित्रपटाद्वारे करतोय मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण
फेब्रुवारी महिना आला कि प्रेमवीरांना वेध लागतात ते वॅलेन्टाईन डे चे. प्रेमवीरांच्या या उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आणि प्रेमाची अनोखी सफर घडविण्यासाठी प्रीतम हा मराठी चित्रपट सज्ज झाला आहे. चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. १९ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ऍड फिल्म मेकर सिजो रॉकी यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
कोकणच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर बहरणाऱ्या या प्रेम कथेत प्रणव रावराणे आणि नक्षत्रा मेढेकर हि फ्रेश जोडी पाहायला मिळणार आहे. त्यांच्या सोबत उपेंद्र लिमये, शिवराज वाळवेकर, आनंदा कारेकर, अस्मिता खटखटे, आबा वेलणकर, समीर खांडेकर, नयन जाधव, विश्वजित पालव, अजित देवळे, कृतिका या कलाकारांच्याहि महत्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटातील शंकर महादेवन यांच्या आवाजातील ‘तुझ्या रूपाचं चांदणं सभोती’ हे प्रेम गीत १४ जानेवारीला मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात येणार आहे.
‘प्रीतम’ चित्रपटाच्या माध्यमातून कोकणचे सौंदर्य प्रेक्षकांना अनुभवता येणार असून या लोकेशन व प्रेमकथेविषयी बोलताना दिग्दर्शक सिजो रॉकी सांगतात कि, ‘सगळ्यांना प्रेमात पाडणाऱ्या लोकेशनची आवश्यकता होती आणि त्यासाठी आम्हांला कोकणाशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. एक नितांतसुदर आणि मनाला मस्त फील देणारा अनुभव ‘प्रीतम’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना मिळेल’,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चित्रपटाची निर्मिती फैझल निथीन, सिजो करीत आहेत. चित्रपटाची संहिता सुजित कुरूप, पटकथा-संवाद गणेश पंडित यांचे असून चित्रपटाची गीते गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. कला दिग्दर्शन संदीप रावडे करीत असून कास्टिंग डायरेक्टर आणि वेशभूषा चैत्राली डोंगरे करीत आहेत तर संकलन जयंत जठार करणार आहेत. छायांकन ओम प्रकाश, संगीत विश्वजिथ यांचे तर नृत्य दिग्दर्शन सुजित कुमार यांचे आहे. जय कुमार नायर, रफिक टी. एम आणि चैत्राली डोंगरे हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.
मराठी चित्रपटांचा ट्रेंड सध्या बदलतोय. मराठी चित्रपटांमधील वाढती प्रयोगशीलता आणि त्याला प्रेक्षकांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे बॉलीवूडसह अनेक प्रादेशिक कलावंतांनाही मराठी चित्रपटसृष्टीने कायमच खुणावलं आहे. पण आता तेवढ्यावरच न थांबता, मल्याळम सिनेसृष्टीतील एक मोठे नाव मराठीत पदार्पण करतय.
विझार्ड प्रोडक्शनच्या माध्यमातून दिग्दर्शक सिजो रॉकी यांनी प्रीतम हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले आहेत. नव्या धाटणीची एक सुंदर प्रेम कथा प्रीतमच्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांच्या समोर आली आहे. हि कथा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी या चित्रपटाच्या टीमला खात्री आहे.
सिजो रॉकी आणि विझार्ड प्रोडक्शन मल्याळम इंडस्ट्रीमध्ये सर्वसृत आहेत, पण त्याच सोबत निर्मिती आणि जाहिरात क्षेत्रातही त्यांनी त्यांचा ठसा उमटवला आहे. अनेक लघुपटांच्या निर्मितीत त्यांचा सहभाग आहे. मल्याळम इंडस्ट्रीत मिळालेल्या यशानंतर आता ते मराठी इंडस्ट्रीकडे वळले आहेत. त्यांच्या या प्रयत्नाला उदंड यश लाभो हि सदिच्छा!